Ad will apear here
Next
एक कविता विंदांची
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, लेखक गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांची ‘... पण हे श्रेय तुझेच आहे’ ही कविता वैशिष्ट्यपूर्ण आहे. या कवितेला जसे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे; तसेच अन्यायाला तोंड द्यायची सामान्यांची जिद्द ठसवणारा यातला आशय सार्वकालिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. १४ मार्च हा विंदांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, ज्येष्ठ लेखिका-समीक्षक डॉ. नीलिमा गुंडी यांनी केलेले या कवितेचे रसग्रहण येथे प्रसिद्ध करत आहोत. 
.............
कविवर्य विंदा करंदीकर म्हणजेच प्रा. गो. वि. करंदीकर. त्यांचे नाव गोविंद. लहानपणी आजी त्यांना लाडाने ‘विंदा’ म्हणत असे. तेच नाव त्यांनी काव्यलेखनासाठी टोपण नाव म्हणून स्वीकारले. त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील धालवली इथला. २३ ऑगस्ट १९१८ रोजी कोकणच्या मातीत जन्माला आलेला हा कवी आपल्या वैश्विक उंचीच्या, मानवतावादी वृत्तीच्या लेखनातही अस्सल कोकणी रंग जपत राहिला. हा कोकणी रंग कधी त्यांच्या फटकळ बोलण्यातून, कधी हातातल्या साध्या कापडी पिशवी वापरण्याच्या सवयीतून, तर कधी ‘पिशी मावशी’च्या कवितेतल्या भुतांच्या उल्लेखातून जाणवत राहिला.

विंदा करंदीकरइंग्रजीचे प्राध्यापक असल्यामुळे त्यांनी मराठीबरोबरच इंग्रजीतूनही लेखन केले. अनुवादातून चांगले इंग्रजी ग्रंथ मराठीत आणण्याचे सांस्कृतिक कार्यही केले. (उदा. ‘अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र’) त्याच वेळी संत ज्ञानेश्वरांच्या ‘अमृतानुभव’ ग्रंथाचे अर्वाचिनीकरण करून, समकालीन वाचकांची अडचणही दूर केली. १९४९च्या ‘स्वेदगंगा’पासून सुरू झालेला त्यांचा काव्यप्रवास, आशय-आविष्काराची वेगवेगळी वळणे प्रयोगशीलतेने आत्मसात करत पुढे जात राहिला. ‘मृद्गंध’, ‘धृपद’, ‘जातक’, ‘विरूपिका’, ‘अष्टदर्शने’ हे त्यांचे काव्यसंग्रह म्हणजे, मराठी काव्यविश्वातले मानदंड ठरले. कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार अशा अनेक सन्मानांनंतर त्यांना २००६मध्ये राष्ट्रीय दर्जाचा सर्वश्रेष्ठ ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाला, तेव्हा तमाम मराठी विश्व आनंदून गेले. विंदांच्या बालकवितांनीही इतिहास घडवला. ‘एटू लोकांचा देश’, ‘राणीची बाग’, ‘अजबखाना’, ‘पिशीमावशी आणि तिची भुतावळ’ अशा त्यांच्या अनेक बालकवितासंग्रहांनी मुलांच्या मनावर राज्य केले. ‘स्पर्शाची पालवी’ आणि ‘आकाशाचा अर्थ’ हे लघुनिबंध, तसेच ‘परंपरा आणि नक्ता’ हे समीक्षात्मक पुस्तक त्यांनी लिहिले. विंदांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू जाणून घेताना या सर्वच लेखनाला महत्त्व येते. 

विंदांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. ते विज्ञाननिष्ठ मार्क्सवादी होते. त्याच वेळी जाणीववादीही होते. दर्शनी विरोध मावळून जावेत, अशीच त्यांची पिंडप्रकृती होती. त्यामुळेच कवी आणि समीक्षक या दोन्ही रूपांत प्राप्त झालेली प्रतिभा आणि प्रज्ञा त्यांच्याकडे नांदू शकली. हा योग तसा दुर्मीळच असतो. समीक्षकांकडून मान्यता मिळाल्यावरही, ते वसंत बापट नि मंगेश पाडगांवकर या आपल्या मित्रांबरोबर गावोगाव काव्यवाचनाचे कार्यक्रम करण्यात रमले. त्यांनी ही वाट त्याज्य ठरवली नाही. साहित्य ही ‘जीवनवेधी’ कला आहे, असे मानणारे विंदा रसिकांना आपल्या कविता ऐकवण्यात सहजपणे आनंद घेत राहिले. २०१०मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला असला, तरी त्यांच्या साहित्यकृतींद्वारे ते रसिकांच्या मनात कायमचे स्थान मिळवून गेले आहेत. 

विंदांच्या काव्यामध्ये मुक्तशैलीतील कविता, सुनीते, गझल, तालचित्रे, मुक्तसुनीते, विरूपिका अशा विविध रचनाप्रकारांचा समावेश आहे. ‘तालचित्रे’ हा त्यांचा स्वनिर्मित काव्यप्रकार होता. त्यांचे संगीतप्रेम आणि काव्यप्रेम यांचा संयोग त्यामागे होता. त्यांच्या कवितांमध्ये ईहवाद, विज्ञाननिष्ठा, मानवता या मूल्यांवरची श्रद्धा आढळते. पार्थिवाप्रमाणेच अपार्थिव जगाचेही संदर्भ त्यांच्या कवितेत विषय झालेले दिसतात. स्वतःच्या कवितांसाठी त्यांनी ‘स्वच्छंद’ हा आघातावर आधारित छंद घडवला. ‘आततायी अभंग’ लिहिताना परंपरेचे नवतेशी नाते जोडले. मर्ढेकर यांच्यानंतर नवकाव्याचे प्रतिनिधित्व करणारी त्यांची कविता, पुढील कवींवरही प्रभाव टाकून गेली आहे. 

‘पण हे श्रेय तुझेच आहे’ या विंदांच्या कवितेचे रसग्रहण या लेखातून करणार आहे. कवितेची पार्श्वभूमी जाणून घेऊ या. एक मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली; पण त्यासाठी मोठा संघर्षपूर्ण ऐतिहासिक लढा द्यावा लागला होता. १९५० ते १९६०दरम्यान सुरू असलेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणजे एक मोठे जनआंदोलन होते. भाषावार प्रांतरचना हे धोरण स्वीकारल्यानंतर, ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ ही आचार्य अत्रे यांची १९४९मधली घोषणा या लढ्यासाठी प्रेरक ठरली. १९५६मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात ही स्वतंत्र राज्ये करून, मुंबई केंद्रशासित करण्याचा केंद्राचा निर्णय मराठी माणसांना अजिबात मान्य झाला नाही. सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, नाना पाटील, डांगे, प्र. के. अत्रे, एस. एम. जोशी आदी अनेक नेते या लढ्यात सक्रिय होते. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आदींच्या प्रेरणादायी रचना आणि हजारो लोकांचा उत्स्फूर्त सहभाग, यामुळे हा लढा यशस्वी झाला; मात्र या लढ्यात एकशे सहा जणांना प्राण गमवावे लागले. मुंबईतील फ्लोरा फाउंटन येथे हुतात्मा चौकात त्यांचे स्मारक आहे. त्यांना उद्देशून ही कविता आहे.

...पण हे श्रेय तुझेच आहे

अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गुळणी थुंकून
तू मातीच्या कुशीत शिरलास.
...ह्याची मांडी मोडू नका; हा माणूस शेवटपर्यंत उभा होता,
बुडणाऱ्या गलबताच्या डोलकाठीसारखा. ह्याच्या हाताच्या मुठी वळा;
भिऊ नका, त्याच्या हातातील सर्व घट्टे खास त्याच्याच मालकीचे आहेत.
त्याचे उघडे तोंड हे असे आवळू नका, पैशाच्या पिशवीसारखे;
मेला असला तरी मवाली आहे... पटकन शिवी घालील!...
आणि असे उपचारासाठी कवटी फुटेपर्यंत थांबूही नका;
ती अगोदरच फुटलेली आहे...
पहा उगवतीला ‘फटफट’ले आहे, आणि उद्याची ताजी बातमी
शाई पिऊन झिंगली आहे.

अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गुळणी थुंकून
तू मातीच्या कुशीत शिरलास;
ती माती तुला विसरणार नाही. अन्यायाची निदान अज्ञानाला चीड आहे.
- ह्या शेवटच्या दगडाचा आधार घेऊन, एक बुरुज अजून दात
विचकीत राहील.
तुझ्या अभावाजवळ मी अजून उभा आहे. अंधार आणि अधिक अंधार
यांच्यामधील रित्या रेताडात डावा पाय रोवून
मी अजून उभा आहे... पण हे श्रेय तुझेच आहे.

(मुंबई - १८ जून १९५६)
(‘संहिता’ : विंदा करंदीकरांची निवडक कविता. संपादक : मंगेश पाडगावकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, १९७५. पृ. १२२) 

‘पण हे श्रेय तुझेच आहे’ ही कविता, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बळी पडलेल्या एका सर्वसामान्य माणसाला उद्देशून लिहिली आहे. विंदांना सामान्य माणसाविषयी कळवळा होता. न्यायासाठी ‘अंधाराच्या मस्ती’वर म्हणजेच जुलूम-जबरदस्तीच्या प्रवृत्तीवर तुटून पडणारी सामान्यांची चिवट जिद्द नि समर्पित श्रद्धावृत्ती, त्या कोणा एका हुतात्म्याच्या बलिदानातून प्रखरपणे लक्षात येते. मांडी तोडणे, मुठी वळणे या विधींनी मृताला तिरडीवर ठेवण्यापूर्वीच्या कृतींची आठवण येते. कवी त्या सामान्य गणल्या गेलेल्या हुतात्म्यांचे मोठेपण विरोधाने लक्षात आणून देताना लिहितात - ‘बुडणाऱ्या गलबताच्या डोलकाठीसारखा’ तो उभा होता. त्याची लढाऊ वृत्ती, त्याची निष्ठा दुर्दम्य होती. त्याच्या हातावरचे घट्टे त्याच्या श्रमजीवी रूपाचे दर्शन घडवणारे होते. ‘त्याचे तोंड आवळू नका, पैशाच्या पिशवीसारखे’ हे कवीचे शब्द एक चरचरीत वास्तव लक्षात आणून देतात. ते म्हणजे, तो गरीब होता. ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’चे सरचिटणीस एस. एम. जोशी यांच्या मते, हा लढा ‘लक्ष्मीनारायण’ विरुद्ध ‘दरिद्रीनारायण’ असा होता. हे लक्षात घेता, कवीच्या शब्दांमागील उपरोध कळतो. (त्या काळी कारखान्यात काम करणारे मजूर मराठी होते आणि काही भांडवलदार मंडळी गुजराती-मारवाडी होती. त्यांचा मुंबई महाराष्ट्राला देण्याला विरोध होता.)
विंदांनी या हुतात्म्याला ‘मवाली’ हा एरव्ही अपशब्द ठरलेला शब्द जाणूनबुजून सन्मानाने वापरला आहे. कारण त्याच्या न्यायासाठी केलेल्या बलिदानामुळे त्याचे जगणे ‘श्रेयस’च्या पातळीवर गेले आहे आणि दांभिक, भेकड उच्चभ्रू वर्गापेक्षा असा निखळ, पारदर्शक ‘मवाली’ नक्कीच श्रेयस्कर!

विंदांमधला श्रेष्ठ कवी भाषेचे सूक्ष्म भान असल्यामुळे कवटी फुटणे, उगवतीला फटफटणे, गोळीचा फटफट आवाज यातील उच्चारसाम्य हेरतो आणि हुतात्म्याच्या बलिदानाने वर्तमानपत्राला दिलेली बातमी अधोरेखित करतो. नवी - न्याय देणारी - पहाट उगवणार असल्याचे सूचितदेखील करतो. महाराष्ट्रासाठी प्राण देणाऱ्या त्या हुतात्म्याला मायमाती प्रेमाने कुशीत घेत आहे. ‘अन्यायाची निदान अज्ञानाला चीड आहे’ ही ओळ पुन्हा बारकाईने वाचावी अशी आहे. पांढरपेशे बुद्धिजीवी लढ्यांपासून दूर राहतात आणि ते ज्यांना ‘अज्ञानी’ मानतात, ते निरक्षर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जीव झोकून देतात. ही वस्तुस्थिती समाजाला पुन्हा अंतर्मुख करायला लावणारी आहे. ‘शेवटच्या दगडाचा आधार घेऊन, एक बुरुज अजून दात विचकीत राहील’ ही ओळ, हुतात्म्याच्या समर्पणाने वाढलेली लढ्याची ताकद लक्षात आणून देते. न्यायासाठीची लढाई ही नेहमीच अवघड असते; पण या ‘अभावग्रस्त’ माणसाने दाखवलेले धैर्य कवीला प्रभावित करते. अधिकाधिक अन्याय्य परिस्थितीतही लढायची हिंमत कवीला मिळते. तो ‘रित्या रेताडास’ म्हणजेच कठीण परिस्थितीत ‘डावा’ पाय रोवून उभा आहे. येथे ‘डावा पाय’ हे शब्द विंदांवर प्रभाव गाजवणारी डावी विचारधारा, वंचितांसाठी उभी राहणारी विचारधारा, सुचवणारे आहेत; मात्र ‘... पण हे श्रेय तुझेच आहे’ अशा शब्दांत, कवी त्या कुण्या एका सर्वसामान्य हुतात्म्यालाच लढ्याचे श्रेय निर्विवादपणे देतो. 

विंदांची ही विशिष्ट घटनेवर आधारित कविता, त्यांच्या जीवनदृष्टीवरही प्रकाश टाकते. त्यांच्या कलादृष्टीची ओळखही त्यातून होतेच. मुक्त शैलीत लिहिलेली ही कविता, विंदांच्या कवितेतील वक्तृत्व, उपरोध, सूक्ष्म भाषाभान व्यक्त करणारे अनुप्रास, जोडाक्षरांच्या जुळणीतून साधलेला आघात अशा अनेकविध वैशिष्ट्यांमुळे वाचकाच्या मनात घर करून राहते. भाषेचे प्रदेशाशी असलेले जैविक नाते हे संस्कृतीचा विचार करता महत्त्वाचे असते. त्यामुळे मराठी भाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास करताना, ही कविता जाणून घ्यावीच लागेल. 

विंदांच्या या कवितेला जसे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे; तसेच अन्यायाला तोंड द्यायची सामान्यांची जिद्द ठसवणारा यातला आशय सार्वकालिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. विंदांच्या सर्वस्पर्शी प्रतिभेला त्रिवार वंदन!!!

- डॉ. नीलिमा गुंडी
ई-मेल : nmgundi@gmail.com
(डॉ. गुंडी या ज्येष्ठ लेखिका आणि समीक्षक असून, त्यांचं विविध विषयांवरील लेखन, समीक्षण प्रसिद्ध आहे. त्यांची पुस्तकं 'बुकगंगा डॉट कॉम'वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/Yhuu9N येथे क्लिक करा.)

(‘विंदां’ची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/ytZe6f येथे क्लिक करा. )





(लेख पूर्वप्रसिद्धी : एक मार्च २०१८)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZTACK
Similar Posts
गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा ‘देणाऱ्याने देत जावे...’ या आपल्याच कवितेत सांगितल्याप्रमाणे स्वतःला पुरस्काराच्या रूपाने मिळालेल्या लक्षावधी रुपयांचे अत्यंत सहजपणे सत्पात्री दान करणारे विंदा हे महाराष्ट्राचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे कवी. आज, २३ ऑगस्ट रोजी त्यांचा जन्मदिन आहे. त्या निमित्ताने आज ‘दिनमणी’मध्ये त्यांच्या काही आठवणी
विंदांची ‘पिशी मावशी’ कविता आणि मतकरींची कथा : अभिवाचन - तनुजा रहाणे ‘पिशी मावशी आणि तिची भुतावळ’ हा कवी विंदा करंदीकरांचा गाजलेला कवितासंग्रह. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमात प्रसिद्ध सूत्रसंचालिका आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट तनुजा रहाणे यांनी त्या कवितासंग्रहातील एक कविता, तसेच रत्नाकर मतकरी यांची ‘ऐक, टोले पडताहेत’ ही कथा सादर केली आहे
सब घोडे बारा टक्के! - अभिवाचन : वैभव मांगले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, लेखक गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांची ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता आजच्या काळातही अगदी तंतोतंत लागू पडते. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून ही कविता आपल्यापुढे सादर केली आहे अभिनेते वैभव मांगले यांनी... व्हिडिओ पाहण्यासाठी आणि कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा
साहित्याच्या पारावर : २६वी मैफल (व्हिडिओ) ‘ग्रंथाली’च्या ‘साहित्याच्या पारावर’ या ग्लोबल साप्ताहिक साहित्यमैफलीच्या २६व्या भागात कवयित्री, लेखिका अंजली कुलकर्णी आणि लेखिका, कवयित्री, समीक्षक, संपादक प्रा. डॉ़. नीलिमा गुंडी सहभागी झाल्या होत्या. डॉ. सुजाता शेणई यांनी संवादकाची भूमिका निभावली. वाचक प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक, लेखक, संपादक डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language